वेलिंग्टन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना 'न भूतो ना भविष्यती' असा झाला. या सामन्याचा थरार पाहून अनेकाच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. निर्धारीत 50-50 षटकात सामना अनिर्णीत राहिला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या जिमी नीशमने जोफ्रा आर्चरला दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याक्षणी त्याच्या प्रशिक्षकांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघानी समान धावा काढल्या. यामुळे सुपर ओव्हरच्या नियमानुसार सामन्यात मारलेल्या चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आले.
अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये बेन स्टोक्सच्या 8 आणि जोस बटलरच्या 7 धावांच्या जोरावर 15 धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 16 धावांची गरज होती. तेव्हा जिम्मी निशम आणि मार्टिन गुप्टील मैदानात आले. जोफ्रा आर्चरने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर जिमी नीशमने षटकार लगावला. हा षटकार पाहून नीशमचे शालेय प्रशिक्षक डेव्हिड गॉर्डन यांनी अखेरचा श्वास घेतला.
'स्टफ डॉट को डॉट एनजेड' या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, डेव्हिड यांची मुलगी लिओनी हिने सांगितले की, सुपर ओव्हर दरम्यान एक नर्स माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुमच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा मला वाटले नीशमने षटकार मारल्यानंतर माझ्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जिमी नीशमचे शालेय शिक्षण ऑकलंडच्या ग्रामर स्कूलमध्ये झाले. या शाळेत त्याचे प्रशिक्षक डेव्हीड जेम्स गॉर्डन हे होते. डेव्हीड यांच्या मार्गदर्शनात बालवयात क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.
याविषयी गुरुवारी नीशन याने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये तो म्हणतो, डेव्हीड गॉर्डन माझे शाळेतले शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्र होते. तुमचे या खेळावर इतके प्रेम होते, की त्यातून क्रिकेटचा प्रसार झाला. माझे भाग्य आहे की मी तुमच्या हाताखाली शिकलो. सामना संपेपर्यंत तुम्ही श्वास रोखू धरलात. मला आशा आहे की, तुम्हाला माझा अभिमान वाटला असेल, असे नीशमने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.