बर्मिंगहॅम- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारत विरुध्द इंग्लड संघामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरलेल्या जेसन रॉयने इंग्लड संघात पुनरागमन केले. रायने सामन्यात भारतीय गोलदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय त्याला नशीबाचीही साथ मिळाली.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात इंग्लडच्या सलामीवीर रॉय आणि बेअरस्टोने आक्रमक सुरूवात केली. तेव्हा हार्दिक पांड्याने टाकलेल्या ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला जीवदान मिळाले. रॉय बाद असल्याची अपील भारतीय खेळाडूंनी केली, मात्र त्यावर डीआरएस न मागितल्याचा फटका भारतीय संघाला बसला.
नेमक काय घडले -
११ व्या षटकात हार्दिक पांड्याने टाकलेला चेंडू वाईडच्या दिशेने गेला, मात्र, त्याला छेडछाड करण्याचा मोह रॉयला आवरता आला नाही. तेव्हा चेंडू त्याच्या ग्लोव्हजला घासून यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात विसावला. धोनीने त्वरित अपील केले, मात्र पंचांनी वाईडचा सिग्नल दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि पांड्या धोनीकडे आले. पण, धोनीने डीआरएस न घेण्यास सांगितले. त्यानंतर रिप्लेत पाहिले असता रॉय बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते.