लंडन - आयसीसी वर्ल्डकरंडक स्पर्धेत सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आले आहे. तर शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीतील अव्वल स्थानही त्यांना गमवावे लागले आहे. ताज्या क्रमवारीनुसार इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
सलगच्या तीन पराभवामुळे इंग्लडला इंग्लंडला दोन गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात १२२ गुण आहेत. तर भारतीय संघ १२३ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. मे २०१८ पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता.न्यूझीलंड दोन गुणांची कमाई करून ( ११६ गुण) तिसऱ्या स्थानी कायम आहे, तर ऑस्ट्रेलिया तीन गुणांच्या कमाईसह ( ११२ गुण) चौथ्या स्थानी आले आहेत. दक्षिण आफ्रिकेची घसरण झाली असून १०९ गुणांसह आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत यजमान इंग्लडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघाने पराभव केला. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश हा अनिश्चित मानला जात आहे. इंग्लडने स्पर्धेत सात सामने खेळून ८ गुण जमा केले आहेत. त्यांना उर्वरित दोन सामन्यात भारत व न्यूझीलंड या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे.