दुबई - माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रिकेटमध्ये लाळ वापरण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. चेंडूला चमकवण्यासाठी गोलंदाज लाळ आणि घामाचा वापर करतात. मात्र, कोरोनामुळे क्रिकेटमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.
''या समितीने आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. पीटर हार्कोर्ट यांच्याकडून लाळेतून व्हायरसचे संक्रमण होण्याच्या वाढीव धोक्याविषयी ऐकले'', असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर सर्वानुमते लाळ वापरण्यावर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली.
स्थानिक सामन्यांच्या अधिकाऱ्यांची अल्प कालावधीसाठी नियुक्ती करण्यात यावी आणि प्रत्येक स्वरूपातील एका संघासाठी अतिरिक्त डीआरएस अपिलची तरतूद अंतरिम उपाय म्हणून करण्यात यावी, असे या शिफारशीत म्हटले गेले आहे.
या शिफारसी व सूचना मंजूर करण्यासाठी समिती जूनच्या सुरुवातीला आयसीसीच्या मुख्य कार्यकारींना आपला अहवाल पाठवेल.