नवी दिल्ली - आयसीसीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीला मजेशीररित्या ट्रोल केले आहे. आयसीसीने हसन अलीचे दोन फोटो 'चतुरपणे' शेअर करत ही खिल्ली उडवली. या पोस्टवर भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. सध्या पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
हेही वाचा - भारताचा इंग्लंड दौरा : भारताचे भारतासोबत रंगणार सराव सामने
वास्तविक, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कराची येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला. कसोटीच्या तिसर्या दिवशी आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने हसन अलीच्या दांड्या गुल केल्या. यावेळी अलीने त्याला चौकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्रिफळाचित झाला. आयसीसीने हसन अलीचा फटका खेळतानाचा पवित्रा टिपला.
त्यानंतर आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर अलीचे दोन फोटो शेअर केले. एका फोटोत हसन अली मोठा फटका खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत वास्तवात नक्की काय घडले, ते दाखवण्यात आले आहे. ''प्रोफाइच पिक्चर विरुद्ध पूर्ण पिक्चर'', असे आयसीसीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले. या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारतीय चाहत्यांनी या पोस्टला मजेशीर म्हटले. तर, पाकिस्तानी चाहत्यांनी या पोस्टसाठी आयसीसीला धारेवर धरले आहे.
पहिल्या कसोटीत पाकिस्तान विजयी -
डावखुरा फिरकीपटू नौमान अलीने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर पाकिस्तानने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटीत सात गड्यांनी नमवले. नौमानव्यतिरिक्त यासिर शाहने चार फलंदाजांना तंबूत धाडले. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ २४५ धावांवर आटोपला. त्यामुळे विजयासाठी मिळालेले ८८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने सहज गाठले. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने १-० अशी आघाडी घेतली आहे.