अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला १२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी कस्सून सराव करत आहेत. या मालिकेच्या आधी इंग्लंडचा मर्यादीत षटकाचा उपकर्णधार जोस बटलर याने आगामी आयसीसी टी-२० विश्व करंडक स्पर्धेचा मुख्य दावेदार कोणता संघ असेल, याची भविष्यवाणी केली आहे.
जोस बटलर याने भारतीय संघ टी-२० विश्व करंडक स्पर्धेचा दावेदार असल्याचे म्हटलं आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्व करंडकाचे आयोजन भारतात होणार आहे.
बटलर म्हणाला, अनेक संघांची कामगिरी शानदार अशी आहे. पण गेल्या काही वर्षात यजमान संघांनी विश्व करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. भारत देखील टी-२० प्रकारामध्ये मजबूत आहे. टी-२० मध्ये भारत ज्या पद्धतीने खेळतो आणि मायदेशात खेळण्याचा होणारा फायदा यामुळे भारत या वर्षाचा मुख्य दावेदार असेल.
टी-२० विश्व करंडकाच्या तयारीच्या दृष्टीने भारत-इंग्लंड यांच्यात सुरू होणारी मालिका, आमच्यासाठी महत्वाची आहे. आशा आहे की आम्ही यात विजय मिळवू. विश्व करंडकाच्या आधी भारताविरुद्ध खेळणे ही एक संघ म्हणून चांगली संधी आहे, असे देखील बटलर म्हणाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून सामन्यांचे प्रक्षेपण सुरू होईल.
हेही वाचा - टी-२० रॅकिंगमध्ये टीम इंडियाची उडी; ICC ने जारी केली ताजी क्रमवारी
हेही वाचा - IND VS ENG : हार्दिक म्हणतोय.. तयारी झाली आहे, मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही