मुंबई - भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने महेंद्रसिंह धोनी संबंधित एक प्रसंग आठवत त्याला आतापर्यंतचा भारताचा महान कर्णधार म्हणून संबोधले आहे. आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सॅमसन म्हणाला, "तो झारखंडहून आला आणि तो भारताचा महान कर्णधार झाला. जेव्हा मी धोनीबद्दल बोलतो तेव्हा मी खूप भावूक होतो."
सॅमसन म्हणाला, "तुम्ही धोनीचे अनुसरण करा आणि नंतर त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करा. परंतु तुम्ही अपयशी ठराल. कारण तुम्ही त्याची फक्त नक्कल करू शकत नाही. मी धोनीला माझ्या स्वप्नात पाहिले होते. या स्वप्नात तो संघाचा कर्णधार होता आणि तो मैदानावर क्षेत्ररक्षण लावत होता. मी स्लिपमध्ये उभा होतो आणि त्याने मला 'संजू तिथे जा' असे सांगितले."
सॅमसन पुढे म्हणाला, "काही दिवसांनी त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मग त्याच्या नेतृत्वात खेळण्याचे माझे स्वप्न कसे पूर्ण होईल याचा मी विचार केला. त्यानंतर काही दिवसांनी, भारत-अ आणि इंग्लंड यांच्यात एक सामना झाला. तेव्हा कर्णधारपदी धोनी होता. मी पाहिलेल्या त्या स्वप्नाप्रमाणे स्लिपमध्ये उभा होतो. तेव्हा धोनीने मला 'संजू तिथे जा' असे सांगितले.''
माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरले हे त्याला सांगितले असते, तर धोनीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले असते, असे सॅमसनने सांगितले आहे.