हैदराबाद - आयपीएलमध्ये आज ४८व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद याच्यांत लढत होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असून, प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाना विजय अनिवार्य आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात असल्याने घरच्या मैदानावर विजय मिळविण्यास सनरायजर्स संघ उत्सुक असणार आहे.
आयपीएलच्या या मोसमात हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी आपल्या खेळीने विरोधी संघाला नामोहरम केले होते. मात्र बेअरस्टो मायदेशी परतला आहे, तर वॉर्नरचा आजचा सामना हा या सत्रातील शेवटचा सामना असणार आहे. आजच्या सामन्यानंतर तोही मायदेशी परतणार आहे. त्यामुळे वॉर्नर आपल्या शेवटच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. वॉर्नरने या मोसमात १ शतकाच्या आणि ७ अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादसाठी ११ सामने खेळताना सर्वाधिक ६११ धावा केल्या असून 'ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला आहे.
घरच्या मैदानावर हैदराबादला हा सामना जिंकायचा असल्याल कर्णधार केन विल्यम्सन आणि डेव्हिड वॉर्नरला मोठी खेळी करावी लागणार आहे. तर पंजाबच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त ही लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्यावरच असेल. यांच्या व्यतिरीक्त सॅम कुरन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि कर्णधार रविचंद्रन अश्विन यांच्याकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा असतील.
हैदराबाद आणि पंजाबच्या संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यातील ५ सामने जिंकण्यास दोन्ही संघाना यश आले आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी १० गुण जमा झाले आहेत. मात्र, नेट रन रेटच्या जोरावर आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबाद चौथ्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून गुणतालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. हा सामना आज रात्री ८ वाजता खेळण्यात येणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद - केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.
किंग्ज इलेव्हन पंजाब - रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग, ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोजेस हेन्रीक, निकोलास पूरन, वरुण चक्रवर्थी , सॅम करन, मोहम्मद शमी, सर्फराज खान, हार्डस विलजोन, अर्शदीप सिंग, दर्शन नालकांडे, प्रभसिमरन सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन.