मुंबई - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडक स्पर्धेत सामना होणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विश्वकरंडकाच्या इतिहासात याआधीही सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार तीन वेळा घडला आहे.
पहिला सामना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - १९९६ विश्वकरंडक स्पर्धा
ऑस्ट्रेलियाने सुरक्षेच्या कारणास्तव १९९६ च्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. श्रीलंकेत लिट्टे आणि श्रीलंका सरकार यांच्यात चालू असलेल्या वादामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने हा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने खेळण्यास नकार दिल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला २ गुण देण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने अरविंद डिसिल्वाच्या (१०७ धावा) शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियालाच ७ गड्यांनी हरवत विजेतेपद पटकावले होते.
दुसरा सामना
झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंड - २००३ विश्वकरंडक स्पर्धा
झिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांच्यासोबत चालू असलेल्या वादामुळे इंग्लंडने झिम्बाब्वेत खेळण्यास नकार दिला होता. यामुळे विश्वकरंडकात इंग्लंडला २ गुणांचे नुकसान झाले होते.
तिसरा सामना
केनिया विरुद्ध न्यूझीलंड - २००३ विश्वकरंडक स्पर्धा
२००३ साली विश्वकरंडकात दुसऱ्यांदा संघाने बहिष्कार टाकण्याचा प्रकार घडला. यावेळी बोको हराम या आतंकवादी संघटनेने दिलेली धमकी आणि सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंडने केनियाविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. यामुळे केनियाच्या संघाला २ गुण देण्यात आले होते. केनियाचा संघ या विश्वकरंडकात उपांत्यफेरीत पोहोचला होता.