लंडन - इंग्लड येथे सुरु असलेल्या आयसीसी विश्वकरंडकात स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. या विश्वकरंडकात कांगारुंनी ७ सामने खेळले असून त्यातील ६ सामन्यांमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर विश्वकरंडकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले आहे.
ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज या स्पर्धेत खोऱ्याने धावा करत आहे. यंदाच्या विश्वकरंडकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर ५०० धावासंह पहिल्या स्थानी आहे. तर त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ४९६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांनीही आतापर्यंत या स्पर्धेत ७ सामने खेळताना प्रत्येकी २ शतके झळकावली आहेत.
गोलंदाजीचा विचार केला तर यातही ऑस्ट्रेलियाचाच दबदबा पाहयला मिळतो. कांगारु गोलंदाज मिचेल स्टार्कने या स्पर्धेत आपल्या वेगवान माऱ्याने विरोधी संघातील फलंदाजांना नामोहरम करुन सोडेले आहे. स्टार्कने या स्पर्धेत ७ सामन्यांमध्ये सर्वाधिक १९ बळी घेतले आहेत. तर पॅट कमिन्स ११ विकेटसह सहाव्या स्थानी आहे.