हैदराबाद - भारत आणि वेस्ट इंडीज संघातील ३ सामन्याच्या टी-२० मालिकेला ६ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. उभय संघात पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी दोनही संघ हैदराबादमध्ये आधीच पोहोचले असून संघांनी कसून सराव केला.
भारत-वेस्ट इंडीज संघातील झालेल्या सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाची कामगिरी दमदार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये पाचव्या स्थानी विराजमान असलेला भारतीय संघ १० व्या स्थानी असलेल्या विंडीजवर नेहमीच 'भारी' ठरला आहे.
वेस्ट इंडीज संघाची कामगिरी मागील ३ वर्षांत खालावली आहे. उभय संघात आतापर्यंत एकूण १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाली आहेत. यात भारतीय संघाने ८ वेळा तर विडींजने ५ वेळा बाजी मारली आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे, विडींज विरुध्द मागील ६ सामन्यात भारतीय संघ एकदाही पराभूत झालेला नाही.
दरम्यान, आता वेस्ट इंडीजच्या संघाचे नेतृत्व केरॉन पोलार्डकडे आहे. पोलार्डला आयपीएलच्या माध्यमातून भारतीय मैदानात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच तो फुल्ल फॉर्मात असून त्याने यावर्षी ५६ टी-२० सामन्यात १२९९ धावा केल्या आहेत. विडींजचा संघ नेहमीच आक्रमक क्रिकेट खेळताना दिसतो. यामुळे भारत-वेस्ट इंडीज मालिका रंगतदार होणार, हे मात्र, जवळपास निश्चित आहे.
हेही वाचा - India vs West Indies : वेस्ट इंडीजला थोपविण्यासाठी भारतीय संघाची 'पळापळ', पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IPL २०२० : मिचेल स्टार्कनंतर 'या' खेळाडूने घेतली आयपीएलमधून माघार