नवी दिल्ली - भारताचे महान माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचा आज वाढदिवस. बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ ला पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. अभिमानाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वार्नने बेदींपासून प्रेरणा घेतली आहे. वाचा रागीट स्वभावाचे अशी ओळख असलेल्या बेदी यांचे विवादीत किस्से...
हेही वाचा - परदेशात 'हिरो' ठरलेला जसप्रीत बुमराह 'या'बाबतीत मायदेशात आहे 'झिरो'
बिशन सिंग बेदी यांनी १९६६ साली मैदानात 'एंट्री' केली आणि त्यांनी १९७९ सालापर्यंत देशासाठी क्रिकेट खेळले. एकेकाळी बेदी यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले होते. आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर बेदी यांनी ६७ कसोटी सामन्यात २६६ गडी बाद केले आहेत. बेदी यांनी फक्त १० एकदिवसीय सामने खेळली असून यात त्यांनी ७ गडी बाद केले आहेत. यासोबत त्यांनी प्रथम श्रेणीच्या ३७० सामन्यात १५६० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
बिशन सिंग बेदी हे अत्यंत रागीट स्वभावाचे म्हणून परिचित आहेत. याचा प्रत्यय अनेकवेळा भरमैदानात आला आहे. भारतीय संघ ३ नोव्हेंबर १९७८ ला बेदींच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुध्द सामना खेळत होता. या सामन्यात अंशुमन गायकवाड आणि गुंडप्पा विश्वनाथ ही जोडी फलंदाजी करत होती. भारताला जिंकण्यासाठी अवघ्या २३ धावांची गरज होती. तेव्हा ३८ व्या षटकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सरफराज नवाज याने लागोपाठ ४ बाऊंसर टाकले. मात्र, पंचानी यातील एकही चेंडू वाईड दिला नाही. तेव्हा बेदींना राग आला आणि त्यांनी दोन्ही फलंदाजांना परत बोलावून घेतले. दरम्यान, हा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि पाकिस्तान संघाला विजयी घोषीत करण्यात आले.
हेही वाचा - मराठमोळ्या 'स्मृती'चा विक्रम; विराट, रोहित, धोनीसारखे दिग्गजही करू शकले नाहीत 'असा' विक्रम
यानंतर असाच किस्सा १९८९-९० मध्ये घडला. भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. यावेळी बेदी हे संघाचे व्यवस्थापक म्हणून न्यूझीलंडला गेले होते. या दौऱ्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. तेव्हा रागात आलेल्या बेदींनी भारतीय संघाला प्रशांत महासागरात बुडवले पाहिजे, असे विधान केले होते.