नवी दिल्ली - भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आता काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो काउंटी क्रिकेटमधील हॅम्पशायर या संघाचे प्रितिनीधीत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले असून हॅम्पशायरकडून खेळणारा रहाणे हा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमच्या जागी हॅम्पशायर क्रिकेट क्लबने रहाणेला संघात स्थान दिले आहे.
विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने काउंटी क्रिकेट खेळण्यााचा निर्णय घेतलाय. यासाठी त्याने बीसीसीआयला एक ई-मेल करत परवानगी मागितली होती. त्यावर निर्णय देताना बीसीसीआयने रहाणेला इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे.
बीसीसीआयने यापूर्वी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि इशांत शर्मा या भारतीय खेळाडूंना काउंटी क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली होती. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या दुखापतीमुळे विराट काउंटी क्रिकेट खेळू शकला नव्हता. पुजारा आणि शर्मा यांनी काउंटी क्रिकेट खेळले असून त्याचा फायदा त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कामगिरी सुधारण्यास झाला आहे.