टोरंटो - कॅनडामध्ये सुरु असलेल्या ग्लोबल टी-२० लीगमध्ये पाकिस्तानचा माजी फलंदाज उमर अकमल याने आपल्याला मॅच फिक्सिंग करण्यासाठी ऑफर मिळाली असल्याचा खुलासा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही ऑफर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिली असल्याचा आरोप अकमलने केला आहे. यामुळे पुन्हा क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर अकमलला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मन्सूर अख्तरने ग्लोबल टी-२० स्पर्धेतील सामन्यात फिक्सिंग करण्याची ऑफर दिली आहे. उमर अकमलने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि ग्लोबल टी-२० लीग प्रशासनाला याबाबत कल्पना दिली आहे. दरम्यान, ग्लोबल टी-२० लीगच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रसासनाकडून याबाबत सखोल चौकशी सुरू असून स्पर्धेतील सर्व खेळाडूंना भारतातील 'क्रिश' नामक व्यक्ती आणि मन्सूर अख्तर यांच्यापासून लांब राहण्यास सांगितले आहे.
कोण आहे मन्सूर अख्तर -
मन्सूर अख्तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आहे. त्याने पाककडून १९८० ते १९९० या काळामध्ये १९ कसोटी सामने, ४१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.