जोहान्सबर्ग - माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची एप्रिल २०२२पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्मिथ मंडळाचा अंतिरम संचालक बनला होता. स्मिथची ही नियुक्ती यंदाच्या आयपीलपर्यंत करण्यात आली होती. मात्र, आता तो २०२२पर्यंत या पदावर राहणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचे कार्यवाह मुख्य कार्यकारी डॉक्टर जॅक्स फॉल म्हणाले, “ग्रॅमीने गेल्या सहा महिन्यांत आपल्या उर्जा, कौशल्य, कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय आणि उत्कटतेने काम केले.” दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी संघाचा एक भाग म्हणून बोर्डात राहिल्याचा आनंद झाल्याचे स्मिथने म्हटले आहे.
स्मिथ म्हणाला, “बरेच काम बाकी आहे. मला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला मूळ ठिकाणी परत आणायचे आहे.” ३९ वर्षीय स्मिथने दक्षिण आफ्रिकेसाठी ११७ कसोटी, १९७ वनडे आणि ३३ टी-२० सामने खेळले आहेत.