दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलला यंदाच्या आयपीएल स्पर्धेतला अव्वल फलंदाज म्हणून संबोधले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्सविरूद्ध झालेल्या सामन्यात ६९ चेंडूत १३२ धावांची नाबाद खेळी खेळली. यष्टीरक्षक, कर्णधार आणि सलामीवीर अशा सर्वच बाबींमध्ये तो यशस्वी ठरला.
राहुलची खेळण्याची पद्धत विलक्षण होती, असे गंभीरने सांगितले. तो म्हणाला, "हा एक परिपूर्ण डाव होता. एकही चूक नव्हती. ही खेळी राहुलची गुणवत्ता काय आहे ते सांगते. तो चांगल्या स्ट्राइक रेटने फटके मारू शकतो. हे सर्वकाही त्याची क्षमता दर्शवते."
भारताच्या दिग्गज माजी सलामीवीर क्रिकेटपटूंमध्ये गौतम गंभीरचे नाव घेतले जाते. आयपीएलमध्ये गंभीरने दिल्ली आणि कोलकाता संघाकडून क्रिकेट खेळले आहे. इतकेच नव्हे, तर त्याने दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले आहे. २०१२ आणि २०१४ या काळात केकेआर गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलमधील चॅम्पियन संघ ठरला होता.