नवी दिल्ली - माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने सचिन तेंडुलकरला सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून संबोधले आहे. गंभीरने सचिनची कारकीर्द पाहता त्याला विराटपेक्षा वरचढ ठरवले आहे. भारताकडून विक्रमी 463 एकदिवसीय सामने खेळणार्या सचिनच्या नावावर 18 हजारांहून अधिक धावा आहेत. त्यात सचिनने 49 शतके केली आहेत. तर, कोहलीने 248 एकदिवसीय सामन्यात 12 हजार धावा केल्या असून 43 शतके ठोकली आहेत.
एका कार्यक्रमात गंभीरला विराट आणि सचिन यापैकी कोणाची निवड करशील असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गंभीर म्हणाला, "सचिन तेंडुलकर ही माझ्यासाठी पहिली निवड असेल. हे खूप कठीण आहे. विराट कोहलीने उत्तम खेळ दाखवला आहे. पण आता क्रिकेटचे नियमही बदलले आहेत, त्यामुळे फलंदाजांना मदत झाली आहे."
सध्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही बाजूंनी दोन नवीन चेंडू वापरले जातात. जेव्हा क्षेत्ररक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा तिन्ही पॉवरप्लेचे वेगवेगळे नियम असतात. गंभीर म्हणाला, “सध्या दोन नवीन चेंडू, रिव्हर्स स्विंग न होणे, 50 षटकांच्या सामन्यात सर्कलमध्ये पाच क्षेत्ररक्षक या गोष्टी आजच्या काळात फलंदाजांसाठी सुकर ठरतात. "
माजी सलामीवीर म्हणाला, "तुम्ही सचिन तेंडुलकरकडे पाहा. त्यावेळी नियम वेगळे होते. त्या दिवसांत 230-240 धावा जिंकण्यासाठी असायच्या. म्हणून मी सचिन तेंडुलकरची निवड करेन."