इस्लामाबाद - भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांनी सोशल मीडियावरील वाक् युद्ध संपवून शांत राहावे, असा सल्ला पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी दिला आहे.
शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या मुद्द्यावर टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आफ्रिदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गौतम गंभीरने सुद्धा आफ्रिदीला सडेतोड उत्तर देत बांगलादेश युद्धाची आठवण करून दिली होती. त्यानंतर या वक्तव्याबद्दल भारतीय खेळाडूंनी आफ्रिदीला चांगलेच सुनावले होते.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी मात्र, या प्रकरणी मध्यस्थी करत गंभीर आणि आफ्रिदी या दोघांनीही शांत राहावे, असा सल्ला दिला आहे. वकार युनूस म्हणाले की, 'गंभीर आणि आफ्रिदीने सोशल मीडियावर भांडण्यापेक्षा जागतिक पातळीवर या बाबत सविस्तर चर्चा करावी. दोघेही हुशार आहेत. त्यामुळे थोडे धीराने घ्यावे.'
भारत-पाकिस्तान यांच्यात २०१३ पासून कोणतीही मालिका खेळवण्यात आलेली नाही. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी तसेच क्रिकेट रसिकांसाठी दोन्ही संघात क्रिकेट सामने खेळवले पाहिजेत. मला वाटत की, आगामी काळात भारत-पाकिस्तानमध्ये सामने होतीलही, पण ते नक्की कुठे खेळवले जातील याबाबत माहिती नसल्याचे वकार यांनी सांगितलं.
दरम्यान, याआधी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका व्हावी, अशी इच्छा पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही बोलून दाखवली आहे.
हेही वाचा - हार्दिक पांड्या होणार 'बाप', सोशल मीडियावर केला खुलासा
हेही वाचा - पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज म्हणतो; मी विराटचा आदर करतो, पण..