नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यामध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. 2019च्या विश्वकरंडक स्पर्धेवेळी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने अंबाती रायडूला वगळून अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरची निवड केली. शिवाय, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना स्थान देण्यात आले नाही. या निवड प्रक्रियेवर गंभीरने प्रश्न उपस्थित केला.
गंभीर म्हणाला, "2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून मला वगळले गेले. त्यावेळी कोणताही संवाद झाला नव्हता. तुम्ही करुण नायरकडे पाहा, त्याला कोणतेही कारण सांगितले गेले नाही. युवराज, रैनाबद्दलही तसेच झाले. अंबाती रायडूचे काय झाले? तुम्ही त्याला दोन वर्ष संघात ठेवले. या वेळी त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. परंतु वर्ल्ड कपच्या आधीच तुम्हाला थ्रीडी प्लेयरची गरज पडली. असे का झाले?''
यावर प्रसाद म्हणाले, "संघात वरच्या फळीत रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन असे फलंदाज होते. त्यापैकी कोणीही गोलंदाजी करू शकत नव्हता. इंग्लंडच्या परिस्थितीनुसार जो वरच्या फळीत फलंदाजीशिवाय गोलंदाजी करण्यासही सक्षम असेल असा खेळाडू आम्हाला हवा होता. म्हणूनच विजय शंकरची निवड झाली."