नवी दिल्ली : येत्या सप्टेंबरमध्ये यूएईत आयोजित करण्यात आलेला 'आशिया कप' रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने याबाबत माहिती दिली. इन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या एका लाईव्ह सेशनमध्ये त्याने याबाबत सांगितले.
आशिया कप रद्द करण्यामागे काय कारण आहे याबाबत मात्र गांगुलीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आशिया कपही रद्द झाला, तर बीसीसीआयकडे आयपीएल आयोजित करण्यासाठी ही चांगली संधी असणार आहे.
यासोबतच, भारतीय क्रिकेट संघ मैदानावर पुन्हा कधी दिसेल? याबाबत विचारणा केली असता, कोरोनाची स्थिती पाहता त्याबाबत आपण काहीही सांगू शकत नसल्याचे गांगुलीने म्हटले. सध्या मैदाने खुली आहेत, मात्र कोरोनाची लागण होण्याचा धोका असल्यामुळे खेळाडू मैदानावर जात नाहीत. आमच्यासाठीही खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे आहे, अशी माहिती गांगुलीने दिली.
हेही वाचा : यंदाचे वर्ष आयपीएलशिवाय संपू नये - गांगुली