केपटाउन - कोरोनाच्या धोक्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका, पहिल्या सामन्यानंतर रद्द करण्यात आली. यामुळे आफ्रिकेचा संघ मायदेशी परतणार आहे. पण त्यांना मुंबई आणि दिल्लीतील कोरोनाच्या फैलावामुळे कोलकाता आणि दुबईमार्गे आफ्रिकेला पाठवले जाणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. यानंतर दुसरा सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ लखनऊमध्ये दाखल झाला होता. तेव्हा कोरोनाच्या धोक्यामुळे उर्वरित मालिका रद्द करण्यात आल्याची घोषणा, बीसीसीआयने केली.
दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे लखनऊ येथून आफ्रिकेचा संघ दिल्ली किंवा मुंबई मार्गे न जाता तो कोलकाता मार्गे मायदेशी परतणार आहे. आफ्रिकेचा संघ लखनऊ येथून कोलकाता आणि कोलकाता येथून दुबई मार्गे आफ्रिकेला रवाना होईल.
कोलकातामध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यामुळे आफ्रिका संघाच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोलकाता सुरक्षित ठिकाण आहे. यामुळे आफ्रिकेचा संघ या ठिकाणाहून आफ्रिकेला प्रयाण करेल.
याविषयी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितलं की, 'दक्षिण आफ्रिकेचा संघ उद्या (ता. १६) कोलकातामध्ये येईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ तारखेला सकाळी कोलकाताहून दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होईल. बीसीसीआय त्यांच्या रहाण्याची व्यवस्था विमानतळाजवळच करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच आम्ही सातत्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संपर्कात आहोत.'
तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहकार्य देऊ असे सांगताना, बिधाननगरचे पोलीस आयुक्त एल. एन. मीना व्यक्तिगतरित्या याची व्यवस्था पाहत असल्याचे सांगितलं.
हेही वाचा - खळबळजनक..! दुबईहून परतलेले रायगडचे १८ क्रिकेटपटू जिल्हा रुग्णालयातून पळाले...
हेही वाचा - ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई, देसी अवतारात केला साखरपुडा