नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर यांच्यातील वाद पूर्ण जगाला सर्वश्रूत आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिदीने आपल्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात गंभीरवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या दोघांमधील वाद परत उफाळून आला होता. या वादात आता आणखी तेल ओतण्याचे काम आफ्रिदीने केले आहे.
भारतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडूण आलेल्या गंभीरने यापूर्वी अनेकवेळा भारताने पाकिस्तानशी कोणत्याच प्रकारचे क्रिकेट सामने खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. गंभीरच्या या भूमिकेबाबत आफ्रिदीला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आफ्रिदी म्हणाला, 'गंभीर हा एक 'बेवकूफ' माणूस असून तो मूर्खसारखी वक्तव्ये करण्यास प्रसिद्ध आहे. अशा मूर्ख माणसाला भारतीय लोकांनी खासदार म्हणून निवडून तरी कसे दिले..? असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात केलेल्या टिकेला उत्तर देताना गंभीरने म्हटले होते की, 'आफ्रिदी तू माझ्यावर केलेली टीका खुपच हास्यास्पद आहे. आम्ही भारतीय अजुनही पाकच्या लोकांना उपचारांसाठी व्हिसा देतो. तो तुलाही मिळेल, आणि तु भारतात आल्यावर एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे मी तुला स्वत: घेऊन जाईन आणि तुझा उपचार करेन'.