कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. आता अख्तरने पुन्हा एकदा क्रिकेटबाहेरील गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. यावेळी त्याने पाकिस्तान सैन्याच्या बजेटबाबत मत दिले आहे.
देशाच्या सैन्याचे वार्षिक बजेट वाढले पाहिजे, असे मत अख्तरने मांडले. याशिवाय त्याने सैन्यप्रमुखांना नागरिकांशी जवळून काम करण्याची विनंतीही केली आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला, "जर अल्लाह मला सामर्थ्य देत असेल तर मी स्वत: गवत खाईन, परंतु सैन्याच्या बजेटमध्ये वाढ करेन. मी माझ्या लष्करप्रमुखांना माझ्याबरोबर बसून निर्णय घेण्यास सांगेन. बजेट २० टक्के असेल तर मी ते ६० टक्के करेन. जर आपण स्वत: हून एकमेकांचा अपमान केला तर ते आपले नुकसान आहे. "
सैन्याचा सन्मान करण्याविषयी बोलण्याची अख्तरची ही पहिली वेळ नाही. १९९९ च्या कारगिल युद्धात भाग घेण्यासाठी काऊंटी क्रिकेट क्लब नॉटिंघमशायरचा १,७५,००० पौंडचा करार धुडकावल्याचा दावा यापूर्वी अख्तरने केला होता. खेळ आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे, असे अख्तरने वारंवार म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये मैदानावर निश्चितच कठोर स्पर्धा आहे. परंतु, मैदानाबाहेर खेळाडू चांगले मित्र राहिले आहेत, असेही अख्तरने सांगितले.