लखनऊ - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे, पण टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला जास्त पसंती दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान यांनी दिले. कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाले आहे. तर, कोरोनाची स्थिती पाहून विश्वकरंडकाच्या आयोजनाबाबतचा विचार केला जाईल, असा आयसीसीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
चौहान यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "आयपीएल ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात महत्वाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा केवळ बीसीसीआयसाठी आर्थिक संसाधने वाढवण्याचे महत्त्वाचे साधन नाही तर नवोदित खेळाडू विशेषत: भारतीय क्रिकेटपटूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता असल्यास त्यास नक्कीच प्राधान्य दिले पाहिजे."
ते पुढे म्हणाले, ''बीसीसीआयला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आयपीएल ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे. बीसीसीआयला आपल्या करारातील खेळाडूंना पगार आणि सेवानिवृत्त खेळाडूंना पेन्शन द्यावे लागेल. यात इतरही अनेक खर्च आहेत. त्यासाठी खूप पैसे लागतात. त्यामुळे बीसीसीआयसाठी आयपीएल ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे. तसेच, भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंना आयपीएलमध्येच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळते. परंतु वर्ल्डकपशी त्याची तुलना करता येणार नाही."
"ऑस्ट्रेलियातील सरकारने अनेक सवलती दिल्यानंतर 25 टक्के प्रेक्षकांसह वर्ल्डकप आयोजित करण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार या स्पर्धेला प्राधान्य मिळेल. कोरोनामुक्त न्यूझीलंडला यजमानपद दिले.''
आयसीसीच्या बैठकीत काय झाली चर्चा ?
आयसीसीच्या बैठकीत कोरोनाबाबत चर्चा करण्यात आली. सध्याच्या घडीला परिस्थिती कशी आहे, याचा अंदाज घेण्यात आला. त्याचबरोबर भविष्यात ही स्पर्धा खेळवायची की नाही, याबाबत चर्चाही करण्यात आली. पण टी-20 विश्वकरंडक खेळवायचा की रद्द करायचा, याबाबत अजूनही आयसीसीने निर्णय घेतलेला नाही.