चंद्रपूर - भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीसह पुन्हा एकदा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचा आनंद घेण्यासाठी पोहोचला आहे. आज सकाळी तो ताडोबाच्या परिसरात पोहोचला असून अलिझंझा गेटमधून त्याने दुपारच्या सफारीसाठी प्रवेश केल्याची विश्वसनीय माहिती ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे. या माहितीला अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. मागील वर्षी जानेवारीत सचिनने ताडोबाला भेट दिली होती.
हेही वाचा - HBD PUJARA : टीम इंडियाची 'नवीन भिंत' झाली ३३ वर्षांची
क्रिकेटप्रेमींमध्ये सचिन तेंडुलकर माहीत नसलेला चाहता मिळणे कठीणच. सचिनने आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाचे नाव जगभरात पोहोचले. ३२ वर्षांपूर्वी सचिनने कराची येथून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराची येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यावेळी पाकिस्तान संघामध्ये वसिम अक्रम, इम्रान खानसारखे वेगवान गोलंदाज होते. सचिन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू होता आणि हा विक्रम अजूनही अबाधित आहे. सचिनने आपल्या कारकीर्दीत ३४ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा जमवल्या.
सचिनची कारकीर्द -
सचिन २०० कसोटी सामने खेळणारा आणि १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटी सामन्यात ५३.७८ च्या सरासरीने आणि ५१ शतकांसह १५ हजार ९२१ धावा केल्या. तर ४६३ एकदिवसीय सामन्यामध्ये ४४.८३ च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा बनवल्या. यामध्ये त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.