कोलकाता - महेंद्रसिंह धोनी केवळ क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर नाही तर धोकादायक फलंदाजही आहे, त्याने वरच्या फळीत फलंदाजी करायला हवी, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले. भारताचा माजी कर्णधार धोनी मंगळवारी 39 व्या वर्षांचा झाला. गांगुलीच्या नेतृत्वात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयसीसीच्या तिन्ही चषकांवर नाव कोरणारा धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.
भारताचा कसोटी सलामीवीर मयंक अग्रवालशी झालेल्या संभाषणादरम्यान गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''सर्वोत्तम खेळाडू निवडणे हे प्रत्येक कर्णधाराचे काम आहे. त्याआधारे तुम्ही सर्वोत्तम संघ तयार करू शकता. आपण त्या खेळाडूच्या आत्मविश्वासाचे अनुसरण करा. भारतीय क्रिकेटला धोनी मिळाला याचा मला आनंद आहे. तो अद्भुत आहे आणि जगातील एक महान फिनिशर आहे."
तो पुढे म्हणाला, "तो जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. जेव्हा मी कर्णधार होतो त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीही केली. विशाखापट्टणममध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध 140 धावा केल्या. माझा विश्वास आहे की त्याने वरच्या फळीत फलंदाजी करावी, कारण तो खूप धोकादायक फलंदाज आहे."
39 वर्षीय धोनीने आतापर्यंत भारतासाठी 350 एकदिवसीय 98 टी-20 सामने खेळले असून त्याने अनुक्रमे 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत. 2005 ते 2014 या कालावधीत धोनीने 90 कसोटी सामने खेळले. या प्रकारात त्याने 4876 धावा ठोकल्या. धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सध्या कोरोनाचे सावट आहे.