चंद्रपूर - यंदाच्या जानेवारी महिन्यात भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीसह पुन्हा एकदा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचा आनंद घेण्यासाठी पोहोचला होता. या सफारीचा व्हिडिओ त्याने आपल्या यूट्यूब अकाउंटवरून पोस्ट केला आहे. सलग दोन वर्षांपासून तो ताडोबाला येत आहे. जानेवारी महिन्यात तो चार दिवस सहकुटुंब ताडोबात तळ ठोकून होता. या दरम्यान घेतलेल्या चित्तरंजक अनुभवाचा व्हिडिओ त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकला आहे. ''सचिन एन्काउंटर्स टायगर्स ऑफ ताडोबा'', असे नाव सचिनने या व्हिडिओला दिले आहे. यात सफारी करताना झालेले वाघांचे दर्शन आणि या अनुभवाचे वर्णन करताना सचिन दिसत आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्रप्रकल्प म्हणून ताडोबाची ओळख आहे. आजवर अनेक दिग्गज व्यक्तींनी ताडोबाच्या जंगल सफारीचा अनुभव घेतला आहे. एकदा आलेल्या व्यक्तीला ताडोबाची भुरळ पडते आणि मग तो परत परत ताडोबातील पट्टेदार वाघ आणि घनदाट जंगलाचा अनुभव घ्यायला नक्की येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील याला अपवाद नाहीत. अनिल कुंबळे तर ताडोबाचा मोठा चाहता आहे. त्याच्याच सांगण्यावरून वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा दोन वर्षांपूर्वी ताडोबात येऊन गेला आणि तोही ताडोबाच्या प्रेमात पडला. हे प्रेम आणि हा आनंद त्याने ट्विटरवर ताडोबातील फोटो टाकून शेअर केला होता. यानंतर क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर याने जानेवारी २०२०ला ताडोबात हजेरी लावली. वाघिणीचे तीन बछडे खेळताना बघत त्याने याचा आनंद लुटला. ही सर्व दृश्ये त्याने आपल्या कॅमेऱ्यात देखील कैद केलीत. हीच ताडोबाची भूरळ सचिनला पुन्हा ताडोबात घेऊन आली.
२४ जानेवारी २०२१ला सचिन सहकुटुंब ताडोबात दाखल झाला. यावेळी त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा हे सर्व सोबत होते. तब्बल चार दिवस येथील सचिन ताडोबात तळ ठोकून होता. यादरम्यान त्याने बफरमधील अलीझंझा, मदनापूर, बेलारा या तीन तर कोअरमधील कोलारा गेटमधून जात एकूण चार सफारी केल्या. त्याला वाघ, बिबटसह रानगवा, सांबर, चितळाने दर्शन दिले. नवरंगी, सातभाई व स्थलांतरित पक्षीही त्याने पाहिले. या अनुभवाची छोटीशी झलक त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकली आहे.
हेही वाचा - ''मोटेरा आणि चेन्नईतील खेळपट्टी भाजी पिकवणाऱ्या मैदानांसारखी''