चेन्नई - तामिळनाडूचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मलोलन रंगराजन आगामी कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) हंगामात प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. सीपीएलचा आठवा हंगाम 10 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे.
31 वर्षीय मलोलन रंगराजनची सीपीएलमधील सेंट किट्स नेव्हिस पैट्रियट्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. या निवडीबाबत त्याने प्रतिक्रिया दिली. ''स्वत: ला भाग्यवान मानतो की, आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला आगामी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) प्रशिक्षक होण्याची संधी मिळाली. 18 ऑगस्टपासून सुरू होणार्या या स्पर्धेत मी बरेच काही शिकवण्यासाठी तयार आहे. माझ्या प्रशिक्षणाची कारकीर्द ही खूप लवकर सुरु झाली. मी खूप उत्सुक आहे. यावेळी प्रशिक्षण हे एक आव्हान असेल आणि मी त्यासाठी तयार आहे'', असे रंगराजनने सांगितले.
उत्तराखंडकडून खेळल्यानंतर रंगराजन गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ‘स्काउटिंग’ प्रमुख बनला होता. फिरकीेपटू म्हणून नाव कमावलेल्या रंगराजनने 47 प्रथम श्रेणी सामन्यात 136 बळी घेतले आणि 1379 धावा केल्या आहेत.