मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून राहुल द्रविडला जेवढे श्रेय मिळायला हवे होते, तेवढे मिळाले नसल्याचे मत माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. गंभीर म्हणाला, "मी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय आणि द्रविडच्या नेतृत्वात कसोटी पदार्पण केले. दुर्दैव आहे की आम्ही द्रविडला कर्णधारपदासाठी जास्त श्रेय दिले नाही. आम्ही फक्त सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी आणि आता विराट कोहलीविषयी चर्चा करतो. पण, राहुल द्रविड देखील टीम इंडियाचा एक महान कर्णधार होता."
गंभीर म्हणाला, "त्याच्या आकडेवारीवरून हे दिसून येते की तो किती 'अंडररेटेड' खेळाडू आणि कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात आम्ही इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये विजय मिळवला आणि सलग 14 किंवा 15 सामने जिंकले. एक क्रिकेटर म्हणून तुम्ही त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सलामी देण्यास सांगितले, त्याने ते केले. तुम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले, त्याने केले. तुम्ही त्याला विकेटकीपिंग करण्यास सांगितले, त्याने केले. आपण त्याला फिनिशर म्हणून खेळायला सांगितले, त्याने तेही केले. म्हणूनच तो एक उत्तम आदर्श आहे. मला असे वाटते की त्याचा खूप प्रभाव होता. "
''सौरव गांगुली चमकदार होता. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा प्रभाव जास्त होता, पण एकूणच पाहिले तर द्रविडचा प्रभाव जास्त होता. त्याची तुलना सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूशी होऊ शकते. संपूर्ण कारकीर्द त्याने सचिनच्या सावलीत घालवली पण प्रभावाच्या बाबतीत तो त्याच्या बरोबरीत होता", असेही गंभीरने म्हटले आहे.