नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसीने आगामी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर भाष्य केले आहे. हसी म्हणाला, ''जर भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवायचे असेल तर त्यांना आपल्या पूर्ण फॉर्ममध्येच रहावे लागेल.'' भारत या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौर्यावर येणार आहे. जेथे उभय संघ चार कसोटी सामने खेळतील.
हसीने एका कार्यक्रमात सांगितले, "स्मिथ आणि वॉर्नर यांचे संघात पुनरागमन होणे ही मोठी गोष्ट आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी खेळलेले खेळाडू बहुधा तयार नव्हते. आता त्यांच्याकडे बरेच काही आहे. भारताला ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज राहावे लागेल."
तो पुढे म्हणाला, "ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन लायन अशा गोलंदाजांचे बळ आहे. मला वाटते की संघ खूप मजबूत दिसत आहे. ते एक शानदार कसोटी सामना खेळतील. आपल्याला माहित आहे, की भारत हा जागतिक दर्जाचा कसोटी संघ आहे, परंतु ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी त्यांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. ''
2018-19 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पराभूत करत इतिहास रचला होता. असा करणारा भारत हा आशियामधील पहिला संघ ठरला. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज फलंदाज नव्हते. बॉल टेम्परिंगमुळे त्यांच्यावर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती.
रोहित शर्मा कसोटी मालिकेत यशस्वी होईल, असा विश्वासही हसीने व्यक्त केला. तो म्हणाला, ''जगातील कोणत्याही फलंदाजाची कसोटी असू शकते. पण मला वाटते रोहित जर एकदिवसीय मालिकेत अव्वल स्तरावर फलंदाजी करतो आणि आता तो कसोटीतही यशस्वी झाला, तर त्याचा आत्मविश्वास वाढेल. तो तिथे जाऊन चांगली कामगिरी करू शकेल."