नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची स्तुती केली आहे. भारताच्या सार्वकालिन पाच महान क्रिकेटपटूंमध्ये जोन्स यांनी धोनीला स्थान दिले. इतकेच नव्हे, तर धोनीचे नेतृत्व 'कोब्रा'सारखे असल्याचे जोन्स यांनी सांगितले आहे.
डीन जोन्स म्हणाले, ''जेव्हा रणनीतीची गोष्ट समोर येते, तेव्हा धोनी पुराणमतवादी राहतो, परंतु तो आरामात त्याच्या विरोधकांना पराभूत करू शकतो. तो मैदानावर शांत स्वभावासाठी ओळखला जातो आणि विकेटच्या मागे तो खेळाडूंवर दबाव न आणता त्यांच्याबरोबर राहतो. तो समोरच्या खेळाडूकडून चूक होण्याची शांतपणे वाट पाहतो आणि चूक झाली, की मग कोब्रासारखा पटकन प्रतिस्पर्ध्याला संपवून टाकतो. म्हणून तो माझ्यासाठी भारतातील सार्वकालिन पाच दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे.''
आयपीएलचा १३वा हंगाम ५३ दिवसांचा आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील.
धोनी यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. त्याची या हंगामात कामगिरी कशी राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.