मुंबई - भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार करुन त्यावरुन बीसीसीआयचे अधिकारी आणि क्रिकेटपटूंना नंबर मागण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संदीप पाटील यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
अज्ञात व्यक्तीने संदीप पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. या माध्यमातून त्याने मेसेंजरचा वापर करत बीसीसीआयमधील अधिकारी आणि इतर क्रिकेटपटूंचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक मागितले. तेव्हा संदीप पाटील यांच्या जवळच्या मित्रांनी फोन करून याबद्दल माहिती दिली. यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
संदीप पाटील यांनी बनावट फेसबुक अकाउंट बनवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला आहे. संदीप पाटील यांचे बनावट सोशल मीडिया अकाऊंट कोणी तयार केले ते समजू शकलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कोणत्या क्रिकेटर्सना त्यांचे नंबर मागण्यात आले याचीही माहिती समोर आलेली नाही.
शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल काही बोलण्यास तुर्तास नकार दिला आहे. मात्र, या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच आरोपी अटक केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.