जमैका - वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू फॅबियन अॅलनला आगामी कॅरेबियन प्रीमियर लीगमधून (सीपीएल) वगळण्यात आले आहे. जमैकाहून बार्बाडोसला जाणारे विमान चुकल्यामुळे अॅलन यंदाच्या सीपीएलचा भाग असणार नाही.
गेल्या महिन्यात सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्सने रिटेन केलेल्या अॅलनला ३ ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथून चार्टर्ड विमानातून उड्डाण करायचे होते. मात्र, विमानतळावर उशिरा आगमन झाल्यामुळे अॅलनचा हा प्रवास चुकला. याप्रकरणी अॅलनच्या एजंटने सांगितले, "दुर्दैवाने, उड्डाणांच्या तपशीलांविषयी काही चुकीच्या माहितीमुळे अॅलन उशीरा पोहोचला. आम्ही सर्व प्रयत्न केले. परंतु, त्रिनिदादमधील साथीच्या आणि प्रवासाच्या निर्बंधांमुळे, चार्टर्ड विमानप्रवास हा देशात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग होता."
कोरोनामुळे स्थगित झालेले क्रिकेट हळूहळू सुरू होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान, बीसीसीआयनेही युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सीपीएलचा आठवा हंगाम १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे. लीगचे सर्व ३३ सामने त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे दोन स्टेडियममध्ये खेळले जातील.