जोहान्सबर्ग - कोरोना व्हायरसचे कारण पुढे करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला. यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा पदाधिकारी ग्रीम स्मिथ याने, ऑस्ट्रेलिया बोर्डाचा हा निर्णय अत्यंत निराशाजनक असून यात आफ्रिका बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा संघ या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्यात उभय संघामध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार होती. पण ऐनवेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसचे कारण सांगत, आम्ही हा दौरा करणार नसल्याचे आफ्रिका बोर्डाला कळवले.
ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या या निर्णयावर ग्रीम स्मिथ याने सांगितलं की, 'ऑस्ट्रेलिया बोर्डाने घेतलेला निर्णयावर आम्ही निराश आहोत. आम्ही या दौऱ्यासाठी संपूर्ण तयारी केली होती. यात ऑस्ट्रेलिया बोर्डाकडून असलेल्या आपेक्षा आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होतो. अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलिया बोर्डाने दौरा रद्द केल्याचे कळवले. यात आफ्रिका बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.'
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केल्याने, न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका संघाला संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवर आता सर्व समीकरणे आहेत.
भारतीय संघाने जर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत किमान दोन विजय मिळवले तर तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. इंग्लंडला अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी तीन सामने जिंकावी लागणार आहेत. तर उभय संघातील ही मालिका जर अनिर्णीत राहिली तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहचेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या दरम्यान, ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.
हेही वाचा - IND vs ENG: चेन्नई कसोटीआधी विराटने सराव सत्रात गाळला घाम, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IND vs ENG : अजिंक्य रहाणेची नेट्समध्ये तुफान बॅटिंग; पाहा व्हिडिओ