हैदराबाद - एडीलेडते मेलबर्न आणि पर्थपासून ऑकलंड, आपल्या शरीरावर तिरंगा रंगवून आणि हातात तिरंगा घेऊन एक माणूस सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघासाठी कायम क्रिकेटच्या मैदानात चिअर करत दिसायचा. त्याच्याकडे कोणतीही नोकरी नाही, मात्र भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक सामन्याला तो आवर्जुन उपस्थित असतो.
सचिनही आपल्या या लाडक्या चाहत्याला स्वता: भेटायला बोलवतो, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे तिकीटही देतो. भारताने जेव्हा २०११ चा विश्वचषक जिंकला होता तेव्हा सचिनने त्या क्रिकेटवेड्या चाहत्याच्या हातात विश्वचषक सोपवला होता. त्याचे नाव आहे सुधीर कुमार गौतम.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी सुधीर भारताचा सराव पाहायला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आला होता. त्यावेळी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्याने आपला क्रिकेटबद्दलचा जिव्हाळा व्यक्त केला.
भारत ऑस्ट्रेलियासोबतची टी-२० मालिका हरला असला तरी, एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ जोरदार पुनरागमन करत विजय मिळवेल. तसेच त्याने हेही स्पष्ट केले की, इंग्लंड व वेल्समध्ये होणाऱया आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेसाठी तो इंग्लंडला जाणार आहे.