मँचेस्टर - ख्रिस वोक्स (नाबाद ८४) आणि जोस बटलर (७५) यांच्या कामगिरीमुळे इंग्लंडने पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटीत तीन गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवला. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने इंग्लंडसमोर २७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. वोक्स आणि बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात १० चौकारांसह ८४ धावा करणाऱ्या वोक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या सत्रात एक बाद ५५ धावा केल्या. पाकिस्तानी गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यामुळे चहापानापर्यंत इंग्लंडची अवस्था ५ बाद १६७ अशी झाली. मात्र चहापानंतर बटलर आणि वोक्सने संयमी खेळ करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. वोक्सने आपल्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले.
विंडीजविरूद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करता न आल्याने बटलरवर टीका करण्यात आली होती. मात्र, त्याने आपल्या कारकिर्दीचे १७ वे अर्धशतक पूर्ण करत टीकाकारांना चोख उत्तर दिले. घराबाहेरचा हा पाकिस्तानचा सलग सातवा पराभव आहे. पाकिस्तानकडून यासिर शाहने ४ तर शाहिन आफ्रिदी, मोहम्मद अब्बास आणि नसीम शाह यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक -
नाणेफेक - पाकिस्तान (फलंदाजी)
पाकिस्तान पहिला डाव - सर्वबाद ३२६
इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद २१९
पाकिस्तान दुसरा डाव - सर्वबाद १६९
इंग्लंड दुसरा डाव - ७ बाद २७७