मुंबई - सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान आणि जॉन्टी होड्स या दिग्गज खेळाडूंची भरणा असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पुन्हा प्रारंभ होत आहे. या मालिकेत दोन नव्या संघाची 'एन्ट्री' झाली आहे. इंग्लंड लेजेंड्स आणि बांगलादेश लेजेंड्स अशी या दोन नव्या संघांची नावे आहेत.
२ ते २१ मार्च दरम्यान या मालिकेतील सामन्यांचे आयोजन केले जाईल. छत्तीसगडच्या रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हे सर्व दिग्गज खेळाडू पुन्हा क्रिकेट खेळताना दिसतील. कोरोनाच्या प्रवासी निर्बंधामुळे ऑस्ट्रेलियाच्या लेजेंड्स संघाने या मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत बांगलादेश लेजेंड्सचा समावेश झाला आहे.
हेही वाचा - चेन्नईत अश्विनचा बोलबाला, दिग्गज क्रिकेटपटूची केली बरोबरी
बांगलादेश लेजेंड्सव्यतिरिक्त इंग्लंड लेजेंड्स हा या स्पर्धेचा सहावा संघ म्हणून प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज गेल्या वर्षी सुरू झाली होती, परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्पर्धेचे केवळ चार सामने खेळले गेले.