मँचेस्टर - इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी-२० सामना इंग्लंडने ५ गडी राखून जिंकला. पाकने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९५ धावा केल्या होत्या. हे आव्हान इंग्लंडने ५ गडी आणि ५ चेंडू शिल्लक राखत सहज पूर्ण केले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर जोडीने अर्धशतकी सलामी दिली. नवव्याच षटकात बाबर आझम आणि फखर जमान यांनी धावफलकावर ७२ धावा झळकवल्या होत्या. यामध्ये बाबरने ४४ चेंडूंमध्ये ५६ धावा मिळवल्या, तर जमानने ३३ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद हाफीजने ३८ चेंडूंमध्ये ६९ झावा चोपत पाकिस्तानला बळकट स्थितीमध्ये आणले. पाकिस्तानने इंग्लंडसमोर १९६ धावांचे आव्हान ठेवले.
पाकिस्तानने दिलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडची सुरूवात चांगली झाली. पॉवर-प्ले दरम्यान टॉम बॅन्ट्रॉन आणि जॉनी बेअरस्टो यांनी ६० धावांची कमाई केली. पॉवरप्ले नंतर मात्र शादाब खान या फिरकीपटूने या दोघांनाही बाद करत तंबूत पाठवले. यावेळी इंग्लंड संकटात सापडले होते, मात्र त्यानंतर आलेल्या मॉर्गनने केवळ ३३ चेंडूंमध्ये ६६ धावा मिळवत इंग्लंडची बाजू सावरली. त्याला डेविड मालननेही चांगली साथ दिली. डेविडनेही यावेळी अर्धशतक झळकवले. १७व्या षटकामध्ये मॉर्गन तंबूत परतला. मात्र, डेविडने अखेरच्या षटकापर्यंत खेळत इंग्लंडला विजय मिळवून दिला.
या विजयासह इंग्लंडने तीन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.