मँचेस्टर - टी-२० मालिकेतील पराभव मागे सारत ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेची सुरूवात विजयाने केली. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १९ धावांनी जिंकला. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावत, प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २९४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ ९ बाद २७५ धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह ३ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. जोश हेजलवुड सामनावीर ठरला.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २९५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना इंग्लंडचे चार गडी झटपट माघारी धाडण्यात यश आले. जोश हेजलवूडने जेसन रॉय (३), ज्यो रुट (१) ला बाद केले. तर अॅडम झम्पाने कर्णधार इयॉन मार्गन (३) माघारी पाठवलं. ग्लेन मॅक्सवेलने जोस बटलरचा अडथळा (१) बाजूला काढला.
इंग्लंडची अवस्था ४ बाद ५७ अशी झाली. तेव्हा जॉनी बेअरस्टोव आणि सॅम बिलिंग्जने डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी केली. ८४ धावांवर असताना बेअरस्टोव झम्पाच्या गोलंदाजीवर हेजलवूडकडे झेल देऊन बसला. त्यानंतर पुन्हा इंग्लंडचा डाव गडगडला. मोईन अली (६), ख्रिस वोक्स (१०), आदिल रसिद (५) ठराविक अंतराने बाद झाले. दुसऱ्या बाजूने बिलिंग्जने शानदार शतक झळकावले. पण तो संघाला विजयी करण्यात अपयशी ठरला. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर वॉर्नरकडे तो झेल देऊन बसला. बिलिंग्जने ११० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारासह ११८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने ४, हेजलवूडने ३ आणि मिचेल मार्श, पॅट कमिन्सने प्रत्येकी १-१ गडी टिपला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात देखील खराब ठरली. सलामीवर डेव्हिड वॉर्नर (६) आणि कर्णधार अॅरोन फिंच (१६) स्वस्तात बाद झाले. त्यापाठोपाठ मार्नस लाबुशानेही २१ धावांवर माघारी परतला. मार्कस स्टॉयनिस (४३), मिचेल मार्श (७३) आणि मॅक्सवेल (७७) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मार्शने कारकिर्दीतील १२ वे तर मॅक्सवेलने २० वे अर्धशतक झळकावले. दोघांनी सहाव्या गड्यासाठी १२६ धावांची भागिदारी केली. त्यांच्या या खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २९४ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी ३-३ गडी टिपले. आदिल रशिदने २ तर ख्रिस वोक्सने १ गडी बाद केला.