ठाणे - सेन्ट्रल मैदानावर स्पोर्टींग क्लब कमिटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 33 व्या डॉक्टर श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी खेळण्यात आला. या सामन्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने बेनेटन क्रिकेट संघाचा ५ गडी राखून पराभव करत सलग सहाव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करताना बेनेटन संघाने ३३.४ षटकात १३७ धावा केल्या. मधल्या फळीतील निखिल पाटीलने ३४ चेंडूत ४७ धावा केल्या. विकास रेपाळेच्या अचूक डावखुऱ्या फिरकी माऱ्यासमोर बेनेटन संघाचे दोन्ही सलामीवीर गारद झाले विकास रेपाळे याने ४३ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले. तर अर्जुन शेट्टी याने १७ धावांच्या मोबदल्यात २ गडी व हेमंत बुचडे याने १४ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद करून त्याला मोलाची साथ दिली.
१३८ धावांचा पाठलाग करताना एकनाथ शिंदे क्रिकेट संघाचा निम्मा संघ अवघ्या २२ धावांमध्ये गडगडला. परंतु, संजय संसारेने ७५ चेंडूत नाबाद ४४ धावा तर डावखुरा फलंदाज हेमंत बुचडेने ६७ चेंडूत नाबाद ६३ धावा करत १२२ धावांची भागीदारी रचत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले.
सलग सहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद संपादन केल्याने एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने मैदानात एकच जल्लोष केला. याच संघाने नुकतेच ठाणे प्रीमीयर लिग टी-२० चषकावर देखील आपले नाव कोरले होते.