शारजाह - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात महत्वाचा सामना होणार आहे. कारण, पंजाबसाठी हा सामना 'करा किंवा मरा' अशा स्थितीतील आहे. तर दुसरीकडे कोलकाता आजच्या सामन्यात दोन गुणांची कमाई करून प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी उत्सुक आहे.
पंजाबने पाच पराभवानंतर खेळ उंचावत सलग चार विजय मिळवले. महत्वाची बाब म्हणजे पंजाबने टॉप-३ मधील संघाला पराभूत केले. यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत त्यांना आव्हान राखता आले. पंजाबची फलंदाजी बहरात आहे. केएल राहुल, मयांक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन हे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. पण गोलंदाजी ही पंजाबसाठी सर्वात चिंतेची बाब आहे. मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई यांचा अपवाद वगळता एकही गोलंदाज पंजाबसाठी प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. डेथ ओव्हरमध्ये पंजाबचे गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरत आहेत. असे असले तरी, शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अवघ्या १२६ धावा असताना पंजाबच्या गोलंदाजांनी १२ धावांनी विजय मिळवून दिला.
दुसरीकडे कोलकात्याने शनिवारी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला ५९ धावांनी पराभव केला. या सामन्यात नितीश राणा आणि सुनिल नरेन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. पण, शुबमन गिल, दिनेश कार्तिकला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. त्यांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. तर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनेही दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेत त्याची गोलंदाजीची लय दाखवून दिली. बाद फेरीचा विचार करण्यासाठी कोलकात्याला फलंदाजीत सातत्य टिकवण्याची गरज आहे. लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स ही वेगवान जोडीही कोलकात्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
दरम्यान, पंजाबने ११ सामन्यांत पाच विजय आणि ६ पराभवांसह १० गुणांची कमाई केली आहे. याउलट कोलकात्याचे ११ सामन्यांतून ६ विजय आणि ५ पराभव यांच्यासह १२ गुण आहेत. कोलकाता चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानी आहे. जर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवता आला तर पंजाबला चौथे स्थान काबीज करता येईल. याउलट कोलकाता जिंकला तर चौथे स्थान त्यांना राखता येईल.