अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज डबल हेडरमधील पहिला सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा होणार आहे. दिल्लीला आपले अव्वल स्थान कायम राखायचे असेल तर, त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तर दुसरीकडे कोलकातासाठी हा सामना प्ले ऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
दिल्लीकडून शिखर धवन शानदार फॉर्मात आहे. त्याने मागील दोन सामन्यांत सलग दोन शतके झळकावली आहेत. युवा पृथ्वी शॉला सलामीला चांगली खेळी करावी लागेल. शॉला गेल्या चारपैकी दोन डावांमध्ये खाते उघडता आले नाही. कर्णधार श्रेयस अय्यर स्नायूची दुखापत उद्भवण्यापूर्वी जशी फलंदाजी करीत होता, तशी फलंदाजी करण्यात अपयशी ठरत आहे. दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत संघर्ष करताना दिसत आहे. मार्कस स्टायनिस मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आहे. वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खिया, कॅगिसो रबाडा भेदक मारा करत आहेत. त्यांना अनुभवी रवीचंद्रन अश्विनच्या फिरकीची साथ लाभत आहे.
केकेआर संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर सामन्यात उतरणार आहे. त्या लढतीत केकेआर संघाला केवळ ८४ धावा करता आल्या होत्या. केकेआर सध्या १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. शुभमन गिल, नितीश राणा यांचे अपयश कोलकातासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवाय अनुभवी दिनेश कार्तिकलाही छाप पाडता आलेली नाही. आंद्रे रसेल, सुनील नरेन मागील सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. आजच्या सामन्यात देखील आंद्रे रसेलच्या समावेशाबाबत साशंकता आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, शुभव मावी यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल.
दिल्ली-केकेआर हेड टु हेड -
उभय संघाता आतापर्यंत २५ सामने झाले आहेत यात दिल्लीने ११ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर कोलकाताच्या संघाने १३ सामन्यांत बाजी मारली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्गुसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, टॉम बँटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिच्छाने, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, एनरिच नॉर्खिया, डॅनियल सॅम्स.