मुंबई - बीसीसीआयच्या श्रीमंत संघापैकी एक असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर विजय पाटील यांची निवड निश्चित मानली जात होती. आज शुक्रवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
हेही वाचा - बास्केटबॉल : एनबीएचे भारतात आगमन! दोन दिग्गज संघ येणार आज आमनेसामने
असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदावर अमोल काळे तर, सचिव पदावर संजय नाईक यांची निवड करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विजय पाटील यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांची युती असलेल्या बाळा म्हादळकर गटाचा पाठिंबा होता. यंदाच्या निवडणुकीत म्हादळकर गटाचे वर्चस्व राहिले. त्यांनी एकूण १४ जागांपैकी १० जागांवर विजय मिळवला आहे.
निवडणुकीसाठी उभे राहिलेले संदीप पाटील एका वाहिनीसाठी समालोचन करतात. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशीमुळे त्यांना एकाच वेळी दोन पदावर राहता येणार नाही. या सर्व प्रकरणामुळे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.