नवी दिल्ली - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याच्या खटल्यात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शमीचे वकील सलीम रहमान यांनी त्याला अटकेपासून वाचवण्यात यश मिळवले आहे.
हेही वाचा - विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
एका मीडियासंस्थेला सलीम यांनी माहिती दिली. 'असा कोणता प्रकार नव्हता जेणेकरून शमीला सरेंडर करण्यास सांगितले गेले होते', असे सलीम यांनी म्हटले आहे. वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर शमी अमेरिकेला निघून गेला. त्यानंतर तो बीसीसीआय आणि त्याचे वकील सलीम रहमान यांच्या संपर्कात होता.
शमीविरोधात पत्नी हसीन जहांने गुन्हा दाखल केल्यानंतर, २ सप्टेंबरला शमीविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. कोलकाताच्या अलिपूर न्यायालयाने त्याला १५ दिवसात शरण जाण्याचे आदेश दिले होते. पण, वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत शमी व्यग्र असल्याने त्याला भारतात येणे शक्य झाले नाही. पण, येत्या १२ सप्टेंबरला शमी भारतात येणार आहे. शमी आणि त्याच्या भावावर घरगुती हिंसाचारबद्दल आय.पी.सी च्या कलम ४९८ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हसीन जहांने ममता बॅनर्जींचे आभार मानले -
हसीन जहां म्हणाली होती, 'मला ममता बॅनर्जींनी वाचवले. मी न्यायालयीन यंत्रणेची आभारी आहे. वर्षभरापासून मी न्यायासाठी झगडत आहे. जर शमी एक मोठा क्रिकेटपटू आणि खूप शक्तिशाली आहे असा विचार तो करत असेल तर तसे नाही. जर मी पश्चिम बंगालची नसते, ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी इथे सुखाने राहिले नसते. अमरोहा (उत्तर प्रदेश) पोलिसांनी मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाहीत.'