नवी दिल्ली - वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा पहिला दौरा वेस्ट इंडिजचा आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथमच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावे आणि क्रमांक पाहायला मिळणार आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या जर्सीवर हा बदल करण्यात येणार आहे. 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत अँटीग्वा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटलाच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील सर्व खेळाडू वनडेमधील जर्सी क्रमांकच कसोटीत देखील वापरतील. विराट 18 क्रमांकाची तर रोहित 45 क्रमांकाची जर्सीच घालेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याआधीच सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10 अधिकृतपणे निवृत्त केली होती. जर्सी क्रमांक 7 म्हटलं की, थेट संबंध येतो तो धोनीशी. धोनीने कसोटी क्रिकेटमधून 2015 मध्येच निवृत्ती घेतली आहे. पण आता सर्वांना हा प्रश्न पडला आहे की महेंद्र सिंग धोनीच्या जर्सी क्रमांक 7 चे बीसीसीआय काय करणार? अर्थात जर्सी क्रमांक 7 उपलब्ध असला तरी संघातील अन्य कोणताही खेळाडू या क्रमांकाची जर्सी वापरण्याची शक्यता नाही.
सर्वसाधारणपणे जर्सीला निवृत्त केले जात नाही. पण बीसीसीआयने याआधी सचिनबाबत तसा निर्णय घेतला होता. धोनीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान पाहता बीसीसीआय त्याची जर्सी क्रमांक 7 देखील निवृत्त करू शकते.