नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर एका मोठ्या प्रकरणात अडकला आहे. दिल्लीतील साकेत कोर्टमध्ये 'रुद्र बिल्डवेल रियलिटी प्रायवेट लिमिटेड' या कंपनीविरुद्ध दिल्ली पोलीसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. गंभीर या कंपनीचा ब्रँड अम्बेसेडर असून फ्लॅटधारकांनी या कंपनीवर फसवणूकीचा आरोप लावला आहे.
हेही वाचा - टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने रचला इतिहास, एका डावात ठोकले २० चौकार
पोलिसांनी गंभीर व्यतिरिक्त कंपनीचे प्रवर्तक मुकेश खुराना, गौतम मेहरा आणि बबीता खुराना यांच्यावरही आरोपपत्र दाखल केले आहे. शिवाय, गंभीरवर भारतीय दंड विधानाच्या ४०६ आणि ४२० अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
या कंपनीवर फ्लॅटधारकांनी पैसे घेतल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आर्थिक गुन्हा शाखेने (ईओडब्ल्यू) खटला दाखल केला आहे. 'गंभीरच्या नावावर पैसे घेण्यात आले मात्र, फ्लॅट मिळाले नाही', असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
'२०११ मध्ये गाजियाबादच्या इंदिरापुरम येथे कंपनीच्या एका प्रकल्पामध्ये फ्लॅट विकण्यात आले. ६ जून २०१३ पर्यंत हे फ्लॅट लोकांना ताब्यात मिळणार होते. मात्र, २०१४ पर्यंत हाती काहीच लागले नाही. त्यानंतर, १५ एप्रिल २०१५ मध्ये अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे अनुमोदन रद्द केले', असे या आरोपपत्रात म्हटले आहे.