नवी दिल्ली - २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलवर सध्या टांगती तलवार आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात आयपीएल सापडते का? याचे उत्तर अजून तरी मिळालेले नाही. मात्र, दिल्लीतील चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. यंदाच्या आयपीएलचे सामने दिल्लीत खेळवण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - CORONA : सचिन-लाराची रोड सेफ्टी विश्व सिरीज रद्द!
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आयपीएलचे राज्यात आयोजन करण्यास मनाई केली आहे. याशिवाय शहरातील सर्व खेळांचे कार्यक्रम रद्द केले जाणार असल्याची घोषणा सिसोदिया यांनी केली. पुढील सूचना येईपर्यंत सर्व मोठे कार्यक्रम, परिषद आणि क्रीडा संमेलनांना दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.
बीसीसीआयला (BCCI) मद्रास उच्च न्यायालयाने स्पर्धा रद्द करण्याबाबत विचार करण्यासाठी २३ मार्च पर्यंतची मुदत दिली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल याबाबत १४ मार्च रोजी मुंबईत बैठक घेणार असून याप्रकरणी निर्णय होणार आहे.
प्रेक्षकांविना सामना -
कोरोनाच्या धोक्यामुळे क्रीडा मंत्रालयाने एखादी क्रीडा स्पर्धा पुढे ढकलणे शक्य नसेल, तर ती स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घ्यावी, असा सल्ला दिला आहे. यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे पुढील दोन सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येईल, अशी शक्यता आहे. जर असे झाल्यास क्रिकेटच्या इतिहासात हा प्रेक्षकांविना झालेला पहिला सामना ठरेल.