मुंबई - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये महेंद्रसिंह धोनीची कामगिरी अजूनही भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या बाबतीत खूपच महत्त्वाची आहे असे ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि समालोचक डीन जोन्स यांना वाटते. कोरोनामुळे मिळालेली विश्रांती माजी कर्णधारांसाठी फायदेशीर ठरू शकेल, असेही जोन्स म्हणाले.
जोन्स यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, "या क्षणी असे दिसते, की भारतीय निवडकर्ते यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्यासमवेत आहेत. धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत असेल, तर तो संघात येऊ शकतो. परंतु आयपीएलमधील त्याची कामगिरी चांगली नसेल, तर संघाचे दरवाजे त्याच्यासाठी नक्कीच बंद होतील. कोरोनामुळे मिळालेली विश्रांती त्याच्यासाठी चांगली असेल आणि ती विश्रांती पुनरागमनासाठी खूप महत्त्वाची ठरेल. जसे जसे आपले वय वाढते तसे पुनरागमन करणे कठीण होत जाते."
गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धोनीने अखेर न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघातून बाहेर आहे.
यापूर्वी संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते, की टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी धोनीची निवड आयपीएलवर अवलंबून असेल. मात्र, ही स्पर्धा स्थगित करण्यात आली असून आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे.
जोन्स म्हणाले, "धोनी नक्कीच एक सुपरस्टार आहे. तो महान आहे. मला नेहमीच असे वाटते की महान खेळाडू असणाऱ्याला हवे ते करू द्यावे. सध्या संघात यष्टिरक्षक म्हणून राहुल आणि पंत यांच्याकडे पाहिले जाते. पण सध्या संघात सर्वात मोठी समस्या फिनिशरची आहे. आपल्याकडे फिनिशर कोण आहे?''