ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने एका वर्षाच्या बंदीनंतर पहिले शतक ठोकले. सामन्यादरम्यान परिधान केलेल्या शूजवर त्याने आपल्या तीन मुलींची नावे लिहिली होती. हे पाहून चाहते खूप प्रभावित झाले.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा पार पडला साखरपुडा, ८ डिसेंबरला होणार लग्न
डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तान विरुद्ध गाबा येथे १५४ धावांची खेळी केली. तेव्हा त्याने वापरलेल्या शूजवर त्याच्या तीन मुलींची नावे लिहिली होती. याचे कारण जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याने भावनिक उत्तर दिले.
बंदीमधून परत आल्यानंतर पहिले कसोटी शतक आपल्या मुलींना समर्पित करण्यासाठी वॉर्नरने शूजवर मुलींची नावे लिहिली होती. वॉर्नर आणि त्यांची पत्नी कॅन्डिस वॉर्नर तीन मुलींचे पालक आहेत. पाच वर्षांचा आईवी मे, तीन वर्षांची इंडी रे आणि पाच महिन्यांची इस्ला रोज या त्यांच्या मुली आहेत. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान इस्लाचा जन्म झाला होता.
गाबा येथे खेळलेला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कांगारूंनी एक डाव आणि पाच धावांनी जिंकला. त्या सामन्यापासून वॉर्नरच्या शूजचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.