सिडनी - ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 'द हंड्रेड लीग'मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड या हंगामात १०० चेंडूंची ही स्पर्धा सुरु करणार आहे. जुलैमध्ये सुरु होणारी ही स्पर्धा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे.
हेही वाचा - सुनील छेत्री म्हणतो 'या' खेळात मी रोनाल्डो-मेस्सीला पाणी पाजू शकतो!
द हंड्रेड लीग ज्या काळात होणार आहे तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ झिम्बॉब्वेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे वॉर्नरने राष्ट्रीय संघाला प्राधान्य दिले आहे. साउथर्न ब्रेवने वॉर्नरसाठी एक कोटी १० लाख रुपये इतकी किंमत मोजत संघात दाखल केले होते.
'आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन झाले तर, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर त्यात भाग घेईल', असे मत वॉर्नरच्या व्यवस्थापकांनी (मॅनेजर) व्यक्त केले होते. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतरही वॉर्नर या निर्णयावर ठाम असेल असेही त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या धोक्यामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सद्य परिस्थिती पाहता आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.